स्पीकर बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – राहत्या घरात मध्यरात्री मोठ्या आवाजात सुरू असणारे स्पिकर बंद करण्यास गेलेल्या पोलीसांना धक्काबुक्की करून दमदाटी केल्याची घटना घडली. चतु:श्रृंगी परिसरात काहीजण मोठ्या आवाजात धांगडधिंगा करत होते. त्यामुळे पोलीस तेथे गेले होते. तिघांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी जतिदंर आमरिक सिंग (वय 54, रा. पल्लोड फार्म हाऊस, बाणेर), नवजित जतिंदर बिंद्रा (वय 27 ) आणि हरदिपसींग उर्फ सोनु इंदरपालसिंग आनंद (वय 50, मुंबई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक एन. डी. बेडका यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आरोपींच्या घरातून स्पीकरचा मोठ-मोठ्याने आवाज येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी याठिकाणी गेले. त्यावेळी आरोपी घरात स्पीकर लावून धांगडधिंगा करत होते. त्यामुळे फिर्यादींना त्यांना स्पीकर बंद करण्यास सांगितले. मात्र, पोलीसांशीच वाद घालत त्यांना धक्काबुक्कीकरून दमदाटी केली. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस तपास करत आहेत.


कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. मालधक्का चौकाजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोमनाथ आगतराव राजगुरू (वय 26, रा. वडमुखवाडी) याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार तानाजी आडके यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. मयत व्यक्तीचे अद्याप ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम केले जात आहे.

आभासी चलनात गुंतवणूकीच्या अमिषाने 45 लाखांची फसवणूक

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – आभासी चलनात गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून महिलेची 45 लाखांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मार्केटयार्ड परिसरातील महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, दीपक चौधरी (रा. दिल्ली), भवानीप्रसाद सेंगू (रा. आकुर्डी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेची आरोपींबरोबर दोन वर्षांपूर्वी समाजमाध्यमातून ओळख झाली होती. त्यावेळी चौधरीने महिलेकडे गुंतवणूक सल्लागार असल्याची बतावणी केली होती. त्याने महिलेला आभासी चलनात गुंतवणुकीचे आमिष दाखविले. आभासी चलनात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे सांगितले. त्यानंतर महिलेला बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले होते. तिने वेळोवेळी एकूण 45 लाख रुपये भरले. गुंतविलेल्या पैशांच्या रक्कमेपोटी मिळणारा परताव्याबाबत आरोपी चौधरीकडे विचारणा केली. तेव्हा चौधरी आणि त्याचा साथीदार सेंगू यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीसांकडे तक्रार दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख तपास करत आहेत.

कोथरूडला मोबाईल शॉपी फोडली, साडेपाच लाखांचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसानामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचा धडाका सुरूच असून, कोथरूड परिसरातील मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी तब्बल साडे पाच लाखांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अशोक गवळी (वय 32,रा. नजहे, आंबेगाव) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गवळी यांचे पौड रस्त्यावरील राहुल कॉम्प्लेक्स इमारतीत मोबाईल विक्रीचे दुकान आहे.

चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. तसेच, वेगवेगळ्या कंपनीचे मोबाइल संच तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल लांबवून चोरटे पसार झाले. पोलीसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले असून पोलीस उपनिरीक्षक एन. ए. मुंढे तपास करत आहेत.