पुणे ! प्रभात रस्त्यावर महिलेकडील मोबाईल हिसकावला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात लुटमार करणार्‍या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, प्रभात रस्त्यावर शतपावली करणार्‍या एका महिलेच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना घडली. रविवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याप्रकरणी ज्योति मोरे (वय-26) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक 9 मध्ये राहण्यास आहेत. दरम्यान, त्या रविवारी रात्री जेवण केल्यानंतर सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शतपावली करत होत्या. यावेळी गोखले गरिमाच्या समोर आल्यानंतर पाठिमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला. त्यांनी आरडा-ओरडा केली परंतु, चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर डेक्कन पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही पडताळणी करण्यात येत असून, त्यानुसार चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. अधिक तपास डेक्कन पोलीस करत आहेत.


पुणे स्टेशनला दोन रिक्षा चालकांत तुंबळ हाणामारी , पुर्ववैमनस्यातून घडली घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे स्टेशन परिसरात पुर्ववैमनस्यातून दोन रिक्षा चालकांमध्ये तुंबळ हाणामारीची घटना घडली. एकाने अचानक येऊन लोखंडी पाईपने डोक्यात व पाठीवर बेदम मारहाण केली. रात्री अचानक झालेल्या याप्रकारामुळे परिसरात चांगलाच गोंधळ उडाला होता.

याप्रकरणी लियाकतअली महंमदयुसुफ लष्करी (वय 46, रा. सहकारनगर) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एम.एच.12, एन.डब्ल्यु. 4655 या क्रमांकाच्या रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही पुणे स्टेशन परिसरात रिक्षा चालवितात. येथील गेटसमोर रिक्षा लावतात. दरम्यान, त्यांच्यात यापुर्वी वाद झाले होते. याचा राग आरोपीच्या मनात होता. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी फिर्यादी हे रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ते रिक्षा पार्किंगला उभी करून थांबले असता आरोपी तेथे आला. त्याने अचानक त्यांना शिवीगाळ करून वाद घालण्यास सुरूवात केली. यावेळी त्याने मारहाणीचा प्रयत्न केल्यानंतर दोघांत हाणामारी झाली. त्यानंतर आरोपीने लोखंडी पाईपने डोक्यात व पाठीमागून गंभीर जखमी केले. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.

पाठिमागे वळून पाहिल्यावरून तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हडपसर परिसरात पादचारी तरूणाने पाठिमागे वळून बघितल्याच्या कारणावरून चौघांनी बेदम मारहाण करत कोयत्याने वार केल्याची घटना घडली. याप्रकरणी ओमकार गिरी (वय 22, रा. तरवडे वस्ती, महंमदवाडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार रोहन काळे, यश जावळे, अतुल कचरावळ, महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमकार आणि रोहन, यश, अतुल, महेंद्र एकाच परिसरात राहायला आहेत. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेअकराच्या सुमारास रोहन आणि यश रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी ओमकारने पाठीमागे वळून पाहिले. त्याचा राग आल्यामुळे दोघांनी ओमकार शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. त्यानंतर रोहन आणि यश त्यांच्या दोन साथीदारांना बोलावून ओमकारवर कोयत्याने वार केला. याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार सलीम शेख अधिक तपास करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/