खुशखबर ! पुण्यातील ‘ही’ दुकाने रविवारी दिवसभर सुरू राहणार : महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार दोन्ही शहरात 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसांचा कालावधी आज (शनिवारी) मध्यरात्री संपत आहे. त्यामुळे केवळ उद्या (रविवार) शहरातील दुकाने दिवसभर उघडी राहणार आहेत.

अनेक नागरिक खरेदीसाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेसाठी गर्दी होऊ नये म्हणून रविवारी (दि.19) शहरातील सर्व दुकाने दिवसभर उघडी राहणार आहेत. मात्र, नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक असल्याचे पुणे महानगर पालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले आहे. रविवारी एकाच दिवशी दुकाने दिवसभर उघडी राहणार असून सोमवारपासून सकाळी 8 ते 12 या वेळेतच दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

केवळ रविवारकरिता सकाळी 8 ते सायंकाळी 6 अशी वेळ वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सहा तासांची सवलत प्रशासनाने वाढवून दिली आहे. सोमवारपासून 8 ते 12 या वेळेत दुकाने सुरु राहणार असून यानंतर सर्व दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे.

रविवारी ही दुकाने दिवसभर सुरु राहणार

रविवारी दिवसभर म्हणजेच 8 ते 6 या वेळेत दुकाने उघडी राहणार आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने जसे किराणा दुकान, मटन, चिकन, अंडी, मासे यांची विक्री करणार्‍या दुकानांचा समावेश आहे. ही सर्व दुकाने 14 जुलै पासून बंद होती. ही दुकाने उद्या दिवसभर उघडी राहणार असून सोमवारपासून सकाळी 8 ते 12 यावेळेत सुरु राहणार आहेत.