Pune : जम्बो रुग्णालयातील सर्व तंबू अग्निरोधक ! अग्निशमनाची अद्ययावत सुसज्ज यंत्रणा, 2 फायरब्रिगेडच्या गाड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जम्बो कोविड रुग्णालयातील अग्निशमन (fire brigade) यंत्रणा अद्ययावत सुविधांनी सुसज्ज असून, रविवारी रुग्णालयाच्या परिसरात झालेले स्पार्किंग अवघ्या एका मिनीटच्या आत नियंत्रित यश आले, असल्याची माहिती तेथील अग्निशमन(fire brigade ) यंत्रणांनी दिली.

शिवाजीनगर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर कोरोनाबाधीत रुग्णांच्या उपचारांसाठी अद्ययावत सुविधांनी सुसज्ज कोविड रुग्णालय उभारण्यात आले आहे. रुग्णालयाच्या परिसरात प्रशासकीय कार्यालय आहे. कार्यालयाच्या बाहेरील काँम्प्रेसरमधील तापमान वाढले. त्यामुळे त्यातील रबरी आवरण वितळू लागले. त्यातून बाहेर धूर येऊ लागला. याच टप्प्यावर तातडीने जवळच असलेल्या सिलिंडरमधील कार्बनडाय आँक्साइड फवारून ते स्पार्किंग नियंत्रणात आणले.

जम्बो रुग्णालयात अग्निशमन अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तेथे पुणे महापालिकेची एक अग्निशमनाची गाडी असून, पुणे महानगर प्रादेश विकास प्राधिकरणचीही (पीएमआरडीए) एक गाडी तैनात करण्यात आली आहे. या दोन्ही यंत्रणांचे प्रशिक्षित मनुष्यबळ तेथे उपलब्ध आहे. तसेच, दीपाली डिझाईन एक्सिबिट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीनेही मनुष्यबळ आणि अग्निशमनाची पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

या बद्दल माहिती देताना दीपाली डिझाईन एक्सिबिट प्रायव्हेट लिमीटेड कंपनीचे अग्निशमन यंत्रणा नियंत्रित करणारे सुनील घेणे म्हणाले, “कोविड रुग्णालयात जागोजागी अग्निशमनाची यंत्रणा बसविण्यात आली आहे. प्रत्येक काँम्प्रेसर, जनरेटर, अतीदक्षता विभाग, आँक्सिजन पाईपलाईन या प्रत्येक ठिकाणी अग्निशमन सिलिंडर ठेवण्यात आला आहे. यांची संख्या 192 आहे. तसेच, 27 ठिकाणी आग विझविण्यासाठी पाण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. तीस फुटांपर्यंत उच्च दाबाने पाणी फवारून अत्यंत कमी वेळेत आग नियंत्रित करण्याची क्षमता येथील अग्निशमन यंत्रणेमध्ये आहे. जम्बो रुग्णालयाच्या परिसरात तीन लाख लिटर पाणी साठविले आहे. त्यातील दोन लाख लिटर पाणी टाक्यामध्ये असून, एक लाख लिटर पाणी अग्निशमन यंत्रणेतील जलवाहिन्यांमध्ये आहे.”

पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे म्हणाले, “अवघ्या एक ते दीड मिनटांमध्ये रविवारी झालेले स्पार्किंग नियंत्रणात आणले. त्यामुळे येथे कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही.”

“रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनाही अग्निशमनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत नेमके कोणी काय करायचे याचा समावेश या प्रशिक्षणात आहे, ” असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे म्हणाले, “रुग्णालयातील सर्व तंबू अग्निरोधक आहेत. त्यामुळे हे तंबू पटकन आग पकडणार नाहीत, अशी व्यवस्था यात करण्यात आली आहे. तसेच, नॅशनल बिल्डिंग कोड आणि महाराष्ट्र फायर प्रिव्हेंशनल अँक्ट याच्या तरतूदींप्रमाणे सर्व यंत्रणा येथे सज्ज करण्यात आल्या आहेत. प्रिंकलर, डेटेक्टर, मॅन्यूल फॉल पाँइंट, हाड्रन्स अशा सुविधा येथे आहेत. एखाद्या इमारतीला ज्या-ज्या व्यवस्था केल्या जातात, त्या सर्व या ठिकाणी केल्या आहेत.”