Pune : बोगस कर्जप्रकरणी अमर मूलचंदानी यांचा जामीन फेटाळला; सेवा विकास बँकेची 19 कोटी फसवणूक प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – व्यवसाय विकास आणि वाहन खरेदीच्या नावाखाली बोगस कर्जप्रकरण करून दि. सेवा विकास कॉ. बँकची १९ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बँकच्या तत्कालीन अध्यक्षांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश एस. एन. सोनावणे यांनी हा आदेश दिला.

अमर साधुराम मूलचंदानी (वय ५८, रा. पिंपरी) असे या अध्यक्षांचे नाव आहे. मूलचंदानी हे माजी नगरसेवक आहेत. या गुन्ह्यात यापूर्वी सागर सूर्यवंशी याला अटक करण्यात आली आहे. तर शीतल तेजवानी ऊर्फ शीतल सूर्यवंशी हिला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. बँकेचे व्यवस्थापक हरीश लक्ष्मणदास चुगवाणी, लेखापाल पूजा पोटवानी, मुख्य व्यवस्थापक निलम सोनवानी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश हिंदुजा, हिरू मुलाणी, मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लाखानी यांचा पोलिस शोध घेत आहेत.

सागर सूर्यवंशी याने दोन कार घेण्यासाठी आणि लॉनचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेतून १९ कोटी पाच लाख ९२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. मात्र त्यातून त्याने केवळ एकच कार घेतली व उर्वरित रक्कम भलत्याच कारणांसाठी वापरली. कर्ज मंजूर करताना बँकेच्या पदाधिका-यांनी आरबीआयच्या नियमावलीचे उल्लंघन केले. तसेच कोणतीही खातरजमा न करता बँकेच्या पदाधिका-यांनी मुद्दाम सूर्यवंशी याला मदत केली. या सर्व प्रकारात अध्यक्ष मूलचंदानी यांच्यासह संचालक मंडळाचा सहभाग दिसून आला आहे, असे रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्यातील ८२ लाख रुपयांची बीएमडब्लू गाडी, रोख ९९ लाख ५६ हजार आणि ॲपल कंपनीचा ६० हजार रुपये किंमतीचा मोबाइल जप्त केला आहे.

जामीन दिल्यास पुरावे नष्ट करण्याची शक्यता : सरकार पक्ष
या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर मूलचंदानी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. या गुन्ह्याच्या व्याप्ती मोठी आहे. मूलचंदानी यांना जामीन मिळाल्यास ते पुरावे नष्ट करू शकता. कर्जाचा गैरव्यवहार व अपहारास संबंधित कर्जदार आणि बँक व्यवस्थापन जबाबदार आहे. त्यामुळे अर्जदारांचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.