‘दुर्दैवी ! ‘कोरोना’मुळे आंबेगाव तालुक्यात 3 सख्ख्या भावांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात चांडोली खुर्द गावात शेतकरी कुटुंबातील तीन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. काल तिघा भावांचा सामूहिक दशक्रिया विधी पार पाडण्यात आला. कुटुंबातील तीन ज्येष्ठ सदस्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. दिगंबर इंदोरे (वय 75), वामन इंदोरे (वय 65) व सुदाम इंदोरे (वय 64 ) अशी मृतांची नावे आहेत.

सुदाम व वामन हे दोघे चांडोली खुर्द येथे शेजारीच राहत होते, तर दिगंबर हे चांडोली बुद्रुक गावात राहत होते. सुदाम भिवंडी येथे पेपर मिल मधील कागदाच्या रिंग पुरवण्याचे काम करत होते. ते भैरवनाथ सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष होते. लॉकडाऊन झाल्यापासून गेली सहा महिने त्यांचे वास्तव्य चांडोली खुर्द येथे होते. वामन हे मंचर येथील बाजार समितीत कांदा बटाट्याचे आडते म्हणून काम करत होते, तर दिगंबर हे सर्वात थोरले असून चांडोली येथे शेती करत होते.

तिघाही भावांचे सामाजिक व धार्मिक कार्यात मोठे योगदान होते. त्यांना संसर्ग झाल्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालय कोव्हिड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना पुणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र 17 सप्टेंबर रोजी वामन, 18 सप्टेंबर रोजी दिगंबर व त्यानंतर दोन दिवसांनी 20 सप्टेंबर रोजी सुदाम यांचा मृत्यू झाला. एकामागोमाग एक अशा घरातील तीन ज्येष्ठ सदस्यांना गमावल्यामुळे इंदोरे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like