Pune : कर्वेनगर भागात रूममेटच्या त्रासाला कंटाळून 18 वर्षीय मुलाची आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील कर्वेनगर भागात रूममेटच्या त्रासाला कंटाळून 18 वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी रूममेटला अटक केली आहे.

सागर अशोक पवार (वय 18, रा. गुरुप्रसाद कॉलनी, कर्वेनगर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लक्ष्मण वासुदेव पाटील (वय 30) याला अटक केली आहे. याबाबत सागर याचे चुलते दीपक पवार (वय 40) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर हा बँक मार्केटिंगचे कामे करत होता. तर आरोपी हा पेटीएमचे मार्केटिंग करतो. दरम्यान दोघेही येथील पठाण बॉईझ हॉस्टेलला राहत होते. सागर हा तीनच दिवसांपूर्वी आरोपिसोबत राहण्यास आला होता. सागर याचे चुलते फिर्यादी हे केवळ 10 मिनिटाच्या अंतरावर राहतात. दरम्यान सागर याची नोकरी गेली असे तो घटनेपूर्वी म्हणत होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान त्याला सिगारेट पिण्यास आरोपीने दबाव टाकला. तसेच त्याने सिगारेट पिण्यास नकार दिल्यानंतर त्याला मारून टाकण्याची धमकी दिली. या त्रासाला कंटाळून सागर याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात आरोपीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासणीत सुसाईड नोट मिळून अली. त्यानुसार गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक जाधव हे तपास करत आहेत.