Pune : कोंढवा परिसरात आयटी इंजिनिअर महिलेला हात बांधून लुटले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोंढवा परिसरात एका आयटी इंजिनिअर महिलेला हात बांधून लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार चालविण्याचे प्रशिक्षण देणाऱ्याने एकाच्या मदतीने या महिलेला लुटले असून, त्यांनी गुगल पे व एटीएमच्या माध्यमातून महिलेकडील 50 हजार रुपये आणि हातातील 3 अंगठ्या काढून घेतल्या आहेत.

याप्रकरणी ३५ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रादेश सिंग (रा. साळुंके विहार) आणि त्याच्या मित्रावर जबरी चोरी, अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या साळुंके विहार परिसरात राहतात. त्या बंगळुरू येथील एका कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून काम करतात. त्या वडिलांच्या ओळखीचा असलेल्या सिंगकडे गेल्या आठ दिवसांपासून कार चालविण्याचे प्रशिक्षण घेत होत्या. त्याच्याकडे असलेल्या ओमिनी व्हॅनवर त्या गाडी शिकत होत्या. आरोपी सिंग हा मंगळवारी सकाळी त्यांच्या घरी एका मित्रासोबत आला. त्याने फिर्यादी यांना मित्राच्या फियाट कारवर आज ड्रायव्हिंग करायचे असल्याचे सांगून त्यांना घेऊन गेला. उंड्री परिसरापर्यंत तो त्यांना कार चालविण्याचे प्रशिक्षण देत होता. पण, त्या ठिकाणी चढ आल्यानंतर त्याने त्यांना बाजूच्या सीटवर बसविले.

फिर्यादी या बाजूच्या सीटवर बसल्यानंतर पाठीमागे बसलेल्या सिंगच्या मित्राने आचानक त्यांच्या तोंडात कापसाचा बोळा कोंबला. तसेच, त्यांचे हात बांधून टाकले. उंड्रीपासून ते एनआयबीएम रस्ता परिसरात येईपर्यंत आरोपींनी फिर्यादी यांच्या गुगल पेवरून ४० हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर त्याच्याकडून घराची चावी घेतली. त्याच्या मदतीने घर उघडून त्यांची पर्स आणली. त्यामधील एटीएम कार्डच्या मदतीने दहा हजार रुपये काढून घेतले, तर त्यांच्या हातामधील तीन अंगठ्या कटरने कापून काढल्या. तसेच, त्यांच्याजवळील रोकड घेतली व आरोपी पळून गेले. त्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.