Pune : पुण्याकडून साताऱ्याकडे जाणार LPG चा टँकर खेड शिवापूरजवळ झाला पलटी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्याकडून साताऱ्याकडे जाणार एलपीजीचा टँकर खेड शिवापूरजवळ (वरवे गाव) पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात चालक व क्लिनर दोघेही जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पीएमआरडीए अग्निशमनने दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर पुण्यकडून सातारा येथे जात होता. टँकरमध्ये एलपीजी गॅस भरलेला आहे. वरवे गावाजवळ आल्यानंतर टँकर चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर पलटी झाला. टँकरचा वेग इतका होता की दोन ते तीन पलटी खाऊन टँकर शेतात पडला आहे. यात चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचार करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी दाखल केले. यामुळे त्यांची नावे समजू शकलेले नसल्याचे सांगण्यात आले आहे.

यानंतर याची माहिती पीएमआरडीए अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर दोन बंब आणि क्रेन घेऊन जवान दाखल झाले आहेत. टँकर सरळ करून त्यातील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरला जाणार आहे, असे पीएमआरडीएचे पाटील यांनी सांगितले. त्यासाठी संबंधिताना संपर्क करण्यात आला आहे.