पुण्यातील नामांकित कॉलेजमधील महिला लिपिक लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील प्रसिद्ध अशा राजा धनराज गिरजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या वरिष्ठ महिला लिपिकास एसीबीने 1 हजार 900 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

नीता सतीश गंगावणे (वय 47) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

शहरातील रास्ता पेठ परिसरात राजा धनराज गिरजी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज आहे. याठिकाणी नीता गंगावणे या वरिष्ठ लिपिक म्हणून नोकरीस आहेत. यातील तक्रारदार हे 38 वर्षाचे आहेत. दरम्यान तक्रारदार यांना त्यांच्या सातव्या वेतन आयोग फरकाचे बिल व सेवापुस्तकावर ऑडिटरची सही आणि शिक्का देण्यासाठी 2 हजार 200 रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली असता लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास तडजोडीअंती 1 हजार 900 रुपयांची लाच घेताना पथकाने रंगेहात पकडले.