Pune : गतवर्षी 500 रुपयांना मिळणारे अँटीजेन कीट आता 60 रुपयांत उपलब्ध; महापालिका खरेदी करणार 38 हजार अँटीजेन टेस्टिंग कीट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांच्या तपासणीसाठी मोठ्यासंख्येने कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत आहे. महापालिकेने प्रशासनानेही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग गतीने करण्यासाठी आणखी ३८ हजार ऍन्टीजेन टेस्टिंग कीट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष असे की मागीलवर्षी साधारण ५०० रुपयांना मिळणार्‍या ऍन्टीजेन टेस्टिंग कीटची किमत अगदी  ६० रुपयांपर्यंत कमी झाली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी ३ हजार १११ रुग्ण आढळून आले होते. त्याअगोदरच्या आठवड्यातही दररोज २ हजारांच्या आसपास रुग्ण आढळत होते. महापालिकेने कोरोना टेस्टिंग वाढविल्या आहेत. मागील काही दिवसांपासून दररोज दहा हजारांच्या पुढेच टेस्टिंग करण्यात येत आहेत. यामध्ये ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर पद्धतीने होत असून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांची तपासणी अँटीजेन कीटद्वारे करण्यात येत आहे. मागीलवर्षी मार्चमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाल्यानंतर पहिले दोन ते तीन महिने घशातील स्वाब घेउन एनआयव्ही, ससून येथील लॅबसोबतच खाजगी लॅबमध्येही तपासणी सुरू करण्यात आली होती. यानंतर आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च) च्या गाईडलाईन नुसार कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्यांचे तातडीने विलगीकरण करण्यासाठी अँटीजेन टेस्ट किटचा वापर सुरू करण्यात आला आहे. महापालिकेने आतापर्यंत २ लाख किटस् खरेदी केले आहेत. सुरवातीच्या काळात एका किटची किंमत ५०० रुपये होती.

दरम्यान, आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने तपासण्यांची संख्या वाढविण्यात आल्याने ससूनसह महापालिकेच्या रुग्णालयांकडून अँटीजेन कीटची मागणी वाढू लागली आहे. महापालिकेने ३८ हजार कीटस् खरेदीसाठी कोटेशन मागविली आहेत. किटसाठी ६० रुपये दराने कोटेशन आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.