Pune : संपत्तीसाठी पती आणि जावयाकडून होणार्‍या त्रासाला कंटाळुन ज्येष्ठ महिलेची आत्महत्या, अनुपमा लेले यांनी जीवन संपवलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  संपत्तीसाठी पती आणि जावयाच्या होणाऱ्या त्रासामुळे ज्येष्ठ महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहते घर, दागदागिन्यांची विक्री तसेच मुदतठेव नावावर करण्यासाठी त्यांच्याकडून छळ होत होता.

अनुपमा अशोक लेले (वय 67, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पती अशोक दिगंबर लेले (रा. वनराई कॉलनी, धनकवडी) तसेच जावई नितीन नंदकुमार डहाळे (रा. जिनस टॉवर्स, रास्ता पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनुपमा लेले यांचे भाऊ बाळकृष्ण आगाशे (वय 67, रा. वनराई कॉलनी, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 30 मार्च रोजी आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांपासून बहीण अनुपमा यांना त्यांचे पती अशोक व त्यांचा जावई नितीन डहाळे त्रास देत होते. त्यांच्याकडे राहते घर, दागदागिन्यांची विक्री करण्यासाठी या दोघांनी तगादा लावला होता. तर , जावई डहाळे याने ठेवीचे पैसे त्याच्या पत्नीच्या नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. अनुपमा यांना राहते घर विकण्याची इच्छा नव्हती. डहाळे दडपण आणण्यासाठी त्याच्या पत्नीला मारहाण करत होता. पती आणि जावयाने दिलेल्या त्रासामुळे अनुपमा यांनी 30 मार्च रोजी आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारादरम्यान त्यांचा खासगी रूग्णालयात मृत्यू झाला, असे अनुपमा यांचे बंधू बाळकृष्ण आगाशे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक एच. एस. केंजळे तपास करत आहेत.