Pune : महापालिकेच्या विषय समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे महापालिकेच्या विविध विषय समितींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी ३० सप्टेंबरला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेना या तिनही पक्ष आघाडीत लढणार असून सत्ताधारी भाजपचे संख्याबळ अधिक असल्याने भाजपच्याच सदस्यांची या पदांवरील निवड निश्‍चित मानली जात आहे. कोरोनामुळे निवडणुका लांबल्याने नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षांना जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

शहर सुधारणा समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून प्रसन्न जगताप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गणेश ढोरे यांनी अर्ज दाखल केले आहे. तर याच समितीच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या शितल सावंत तर कॉंग्रेसच्या चॉंदबी हाजी नदाफ यांनी अर्ज दाखल केला आहे. विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी मनिषा लडकत तर शिवसेनेच्या संगीता ठोसर यांचे उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या मनिषा कदम आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अश्‍विनी भागवत यांचा अर्ज दाखल झाला आहे.

महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या माधुरी सहस्त्रबुद्धे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हमीदा सुंडके तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या वृषाली चौधरी आणि शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे. क्रिडा समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे वीरसेन जगताप व कॉंग्रेसचे अविनाश बागवे तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या छाया मारणे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वनराज आंदेकर यांनी अर्ज दाखल केले आहेत.