Pune : खरेदीच्या बहाण्याने 40 शर्ट चोरणाऱ्या महिला व पुरुषांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरून जवळपास 40 शर्ट चोरणाऱ्या महिला व पुरुषांच्या टोळीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी चोरलेले शर्ट रस्त्यावर बसून विक्री केले.

परशुराम यमनाप्पा गायकवाड (वय 49), लक्ष्मीबाई गायकवाड (वय 45), शांता दशरथ गायकवाड (वय 51) आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या जेष्ठ महिला व एका पुरुष अश्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शहरात रस्त्यावर लूटमारीचे गुन्हे घडत आहेत. त्यासोबतच दुकानदारांचे लक्ष विचलीत करून साहित्य चोरी केली जात होती. लष्कर परिसरात एका मोठ्या दुकानात आरोपी हे खरेदीच्या बहाण्याने शिरले होते. त्यावेळी त्यांनी नोकरांचे लक्ष विचलित करत दुकानातून जवळपास 40 शर्ट चोरले होते. काही वेळानंतर हा प्रकार लक्षात आला. यानंतर याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्हीची पडताळणी केली होती. त्यावेळी आरोपी हे सीसीटीव्ही समोर शर्ट धरून तो पाहत असल्याचे भासवत आणि महिला शर्ट साडीत घेऊन गेल्याचे दिसून आले होते. यानुसार या आरोपीचा शोध सुरू होता. त्यावेळी लष्कर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला या आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली. त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी चोरलेले कपडे हे रस्त्यावर बसून विक्री केले असल्याचे सांगितले आहे. त्यातून त्यांना साडे दहा हजार रुपये मिळाले. ते पोलिसांनी जप्त केले आहेत.

ही कारवाई उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत भोसले, सहाय्यक निरीक्षक राऊत, उपनिरीक्षक डोंगळे, कर्मचारी कदम, गायकवाड, कोळी, कांबळे, पठाण, भोसले, हुवाळे, जाधव व काटकर यांच्या पथकाने केली.