Pune : अजितदादांचे नाव घेऊन बांधकाम व्यावसायिकाला धमकावणाऱ्याला अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन –   ‘अजितदादा पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आली आहे,’ असे सांगून बांधकाम व्यावसायिकाला धमकावणारा अखेर बारामती शहर पोलिसांच्या तावडीत सापडला. तुषार तावरे ( (रा. तारांगण सोसायटी, बारामती) यास बारामती पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक अजय कामदार यांनी या संदर्भात फिर्याद दिली होती. तावरे याने कामदार यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव वापरुन धमकी दिली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय कामदार यांना तुषार तावरे याने फोन करुन मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असून अजित पवार यांच्याकडे आपल्याविरुध्द तक्रार आली आहे, ती तुम्हाला व्हॉटसअँपवर पाठवली आहे ती बघण्यास सांगितले. या तक्रारीवर तत्काळ कारवाई करावी असा शेरा मारुन पोलिस उपआयुक्त झोन 9 तसेच सहायक पोलिस आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरिक्षक यांना रिमार्क मारुन त्या खाली उपमुख्यमंत्री यांची सही असल्याचे कामदार यांना दिसले.

कामदार यांनी तावरे याच्याशी संपर्क साधला. तावरे याने त्यांना सांगितले की तुमच्याविरुध्द दिलेला अर्ज मी आयुक्तांकडे पाठविला नसून माझ्याकडेच ठेवला आहे, तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या, नाहीतर तुमच्या विरुध्द कारवाई होईल, असे तावरे याने धमकावले. या नंतर कामदार यांनी थेट उपमुख्यमंत्री कार्यालयात फोन लावून याची चौकशी केल्यानंतर तुषार तावरे नावाचा कोणीही कर्मचारी नसल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या नावाने तुषार तावरे याने अन्य कोणाची फसवणूक केली असल्यास बारामती शहर पोलिसात फिर्याद दाखल करण्याचे आवाहन पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील यांनी केले आहे.