Pune : ऑक्सिजन संपल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पोहचवला प्राणवायु, 20 जणांचे प्राण वाचले, सर्वत्र कोथरूड पोलिसांचे कौतुक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोनाच्या रुग्ण वाढीचा उचांक व त्यात योग्य उपचार, ऑक्सिजन व बेड मिळत नसल्याने भयावह दुर्घटना घडत असून, नाशिक-पुण्यात ऑक्सिजन गळती आणि ऑक्सिजन संपल्याने रुग्णांना जीव गमवावा लागला असतानाच पुण्यात पोलिसांच्या सतर्कतेने तबल 20 रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. ऑक्सिजन संपल्याची माहिती मिळताच ऑक्सिजन पुरवठा केल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. कोथरुड पोलिसांच्या या कामगिरीने नागरिकांकडून कौतुक होत आहे.

कोथरूडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडता-घडता पोलिसामुळे रोखला गेला आहे. या रुग्णालयात 20 रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.

शनिवारी सकाळी रुग्णालय व्यवस्थापनाने कोथरूड पोलिसांना संपर्क साधला आणि 30 ते 45 मिनिटे पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. इतर रूग्णालयात देखील जागा नाही. त्यामुळे ऑक्सिजनवर असणाऱ्या रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयातही हलविता येणार नाही. त्यामुळे या रुग्णाच्या जीवाला धोका आहे, अशी माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून

कोथरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी तात्काळ ऑक्सिजनसाठा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. परिसरात असणार्‍या रुग्णालयामध्ये जाऊन त्यांना घटनेचे गांभीर्य आणि परिस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर पोलिसांनी काही वेळातच सूर्यप्रभा रुग्णालय व सह्याद्री रुग्णालय यांच्याकडून ऑक्सिजनचे चार जम्बो सिलिंडर तत्काळ उपलब्ध करून दिले. त्यानंतर नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाच्या जीवात जीव आला. हा प्रकार टळल्यानंतर शिवाजीनगर येथुन सिलेंडर आणण्यासाठी पोलिसांनी वाहन व क्रेन उपलब्ध करून दिली. तसेच पोलीस संरक्षणात केवळ एक तासाच्या आत कृष्णा हॉस्पिटलला पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करून दिला. यामुळे 20 रुग्णांचे प्राण वाचले गेले. यानंतर नागरिक, नातेवाईक आणि रुग्णालय प्रशासनाने पोलिसांचे आभार तर मानलेच पण त्यांचे कौतुक देखील केले.