Pune : शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळं मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहर पोलीस दलातील एका सहायक उपनिरीक्षकाचे आज कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 56 वर्षीय अधिकारी नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. यामुळे पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. तर कोरोनामुळे 14 वा मृत्यू झाला आहे.

एएसआय मंगेश बिचे (वय 56) असे मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

बिचे हे पोलीस नियंत्रण कक्षात नेमणुकीस होते. दरम्यान त्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांचा आज उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
धक्कादायक म्हणजे त्यांच्या मुलाचा इतर आजारामुळे पंधरा दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्या दुःखात असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पंधरा दिवसात बाप लेकाचा मृत्यू झाल्याने बिचे कुटुंबीय व पोलीस दलात शोककळा पसरली आहे. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचा फटका पोलीस दलाला बसत असून, अनेक पोलिसांनाही कोरोनाची लागण होत आहे.