Pune : अटल बस योजनेला प्रवाशांची पसंती आठवड्याभरात अडीच लाखांहून अधिक प्रवाशांना लाभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   दसर्‍याच्या मुहुर्तावर सुरू झालेल्या पाच रुपयांत पाच कि.मी. प्रवासासाठीच्या अटल योजनेस पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील आठवड्याभरात अडीच लाखांहून अधिक प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, या हेतून पीएमपीने दसर्‍यापासून अटल बस योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत शहराच्या मध्यवर्ती भागातील ९ मार्गांवरून धावणार्‍या ९९ बसेसने ५ कि.मी.चा प्रवास करण्यासाठी ५ रुपये तिकीट आकारण्यात येत आहे. मागील सहा दिवसांमध्ये सुमारे अडीच लाख प्रवाशांना या योजनेचा लाभ झाला आहे. काल एका दिवसामध्ये २८ हजार ५३३ प्रवाशांनी या बसेसने प्रवास केला आहे. यातून महापालिकेला १ लाख ४२ हजार ६६५ रुपये उत्पन्न मिळाले आहे. दरम्यान, काल दिवसभरामध्ये सुमारे २ लाख ५२ हजार प्रवाशांनी पीएमपीने प्रवास केला आहे.

अनलॉकनंतर सुरू झालेल्या पीएमपीचे प्रवासी टप्प्याटप्प्याने वाढू लागले आहेत, हे दिलासादायक चित्र आहे. अटल योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक पीएमपीच्या प्रवासाकडे वळू लागले आहेत. यापुढील काळात या योजनेचा अन्य रुटवरही विस्तार करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी दिली.