Pune : पुर्ववैमनस्यातून सख्ख्या भावांवर टोळक्याकडून कोयत्याने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून सख्ख्या भावडांवर टोळक्याने कोयत्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सिंहगड रोड परिसरात घडली.

याप्रकरणी विकी चावडा व बिट्या पाडळे यांच्यासह सहा जणांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहूल कांबळे (वय २२, रा. सिंहगड रोड) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहूलचा भाउ गणेश व आरोपीची तीन वर्षापुर्वी भांडणे झाली होती. त्यावेळी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्याच कारणातून आरोपी विकी आणि बिट्या राहूल आणि गणेशवर चिडून होते. सोमवारी रात्री पावने अकराच्या सुमारास राहूल व गणेश घरी चालले होते.

त्यावेळी टोळक्याने त्यांना शांताईनगर चौक पठार वस्ती वडगाव येथे गाठून शिवीगाळ केली. आता तुम्हा संपवूनच टाकतो म्हणत टोळक्याने त्यांना लाथाबुक्यांसह बांबूने मारहाण केली. त्यामुळे राहूल व गणेश पळून जात असताना टोळक्यातील एकाने दोघांना मारून टाका असे म्हणत हातातील कोयता फेकून मारला. अधिक तपास उपनिरीक्षक के. एस. तनपुरे करीत आहेत