Pune : बहिणीला बोलल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्‍यात पालघनाने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  मानलेल्या बहिणीला बोलल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्‍यात पालघनाने वार करून त्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली आहे.

ऋतिक राजेश घाडगे (वय 19, रा. कोरेगाव पार्क) याला पकडले आहे, तर आकाश अशोक औसरमल (वय 22, रा. संत गाडगे महाराज वसाहत, कोरेगाव पार्क) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाशचा भाऊ रतन औसरमल (वय 24) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी एकाच परिसरात राहतात. फिर्यादीचा भाऊ आकाश हा टेम्पोचा व्यवसाय करतो. शनिवारी रात्री लक्ष्मी पूजनाच्या दिवशी टेम्पोची पूजा झाल्यानंतर आकाश हा त्याच्या मित्रांसमवेत त्यांच्याच वस्तीमध्ये बोलत उभा होता. त्यावेळी फिर्यादीच्याच वस्तीमध्ये राहणारा ऋतिक घाडगे तेथे आला. त्याने आकाश हा त्याच्या मानलेल्या बहिणीला बोलल्याच्या कारणावरून ऋतिकने वाद घातला. तसेच त्याच्या हातातील पालघन या लोखंडी हत्याराने आकाशाच्या मानेवर वार करीत त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात आकाश गंभीर जखमी झाला. त्यावेळी आकाशला वाचविण्यासाठी त्याचे दोन मित्र दीपक भंडारी व हरीश येरबल हे आला असता, त्यांनाही आरोपीने जिवे मारण्याची धमकी दिली. अधिक तपास सहायक निरीक्षक डी. एस. शिंदे करीत आहेत.