पुण्यातील पांगुळ आळी गल्लीत तरुणावर कोयत्याने वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – पुण्यातल्या गणेश पेठेतील पांगुळ आळी गल्लीत घेराकरून तरुणावर कोयत्याने सपासप वार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

तेजस प्रवीण थोपटे (वय 21), सौरभ हिरालाल दासरी (वय 20) व प्रवेश प्रदीप मसुरकर (21) अशी अटक करण्यात आलेल्यांची नवे आहेत. यात अक्षय दरेकर (वय 25) हा जखमी झाला आहे. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय याचा भाऊ अभिजित याला पूर्ववैमनस्यातून मारहाण केली होती. याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी अक्षय हा रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील पांगुळ आळी येथे गेला होता. त्यावेळी आरोपी तिघेही उभा होते. त्यांना भावाला का मारहाण केली अशी विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तिघांनी घेरा करून अक्षयला मारहाण केली.

तर तेजस याने लोखंडी कोयता डोक्यात घातला. त्यांनतर आरोपी पसार झाले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांचा शोध सुरू केला. तिघांना वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजीत पाटील, पोशि सचिन सरपाले, सचिन येनपुरे, प्रमोद ढाकणे यांच्या पथकाने अटक केली.