पुण्यात मध्यरात्री डेक्कनला स्नुकर कॅफे चालकावर टोळक्याकडून सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – डेक्कन परिसरातील घोले रस्त्यावरील स्नुकर सेंटर चालकावर किरकोळ कारणावरून पाच ते सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

निलेश आनंद पाटील (वय 38, रा. शिवाजीनगर) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत त्यांचा भाऊ आशिष पाटील (वय 34, रा. सकाळनगर, बाणेर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच ते सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींचे घोले रस्त्यावर स्नूकर सेंटर आहेत. सोमवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी हे सेंटरमध्ये खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याच्यासोबत निलेश यांचे वाद झाले होते. त्यावेळी आरोपी तुला दोन तासात बघून घेतो असे धमकी देऊन निघून गेला. त्यानंतर रात्री साडे आकरा वाजता तो त्याचे साथीदारांना घेऊन आला. तसेच, आरोपींनी काठ्या व बेसबॉलच्या स्टीकने तसेच कोयत्याने सपासप वार केले. यामध्ये निलेश हे गंभीर जखमी झाले होते. तसेच, आरोपींनी जाताना त्या ठिकाणाच्या सीसीटीव्हीची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक एस. एच. भागवत या अधिक तपास करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा –