Pune : रिक्षावर दगड मारल्याचा जाब विचारल्यानं चालकाच्या मित्रावर टोळक्याकडून कोयत्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   रिक्षावर दगड मारल्याचा जाब विचारल्याने चालकाच्या मित्रावर टोळक्याने कोयत्याने वार केल्याची घटना कात्रज परिसरात घडली.

अभिजीत येळवंडे असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सर्फराज शेख (वय २१, रा. येवलेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्फराज व अभिजीत हे मित्र आहेत. दोघेही रिक्षाचालक असून कात्रज परिसरात प्रवाशी वाहतूक करतात. दोन दिवसांपुर्वी रात्री साडेनउच्या सुमारास ते प्रवाशाची वाट पाहत संतोषनगरमध्ये थांबले होते. त्यावेळी सर्फराज याच्या रिक्षाला पाठीमागून कोणीतरी दगड मारला. त्यामुळे अभिजीत व ते पाहण्यासाठी मागे गेले. यावेळी चौघेजण त्याठिकाणी उभे होते. त्यावेळी त्यांनी रिक्षाला दगड का मारला असा जाब त्यांना विचारला. त्याचा राग आल्याने सर्फराजला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करुन अभिजीतवर कोयत्याने वार केला. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीशैव चिवडशेट्टी करीत आहेत.