Pune : टोळक्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, नर्‍हेगावातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने सपासप वार केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. नऱ्हे गावात झिल कॉलेज चौकात रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत. भर चौकात ही घटना घडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.. दोन गटातील वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

सुमित नाना वैराट असे टोळक्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झील कॉलेज चौकातील रस्त्यावर रविवारी सायंकाळी सात ते आठ तरुणांच्या टोळक्यांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार केले. यावेळी इमातीत राहणा-या एका व्यक्तीने जखमी तरुणाला घरात घेऊन दरवाजा लावल्याने त्या तरुणाचा जीव वाचला. जखमी तरुणाला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव, उपनिरीक्षक कुलदीप संकपाळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आरोपींच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.