Pune : औंधमध्ये पुर्ववैमनस्यातून काल पोलिसाच्या भावानं केला मर्डर, आज खून झालेल्यांच्या चाहत्यांकडून आरोपीच्या भावावर खुनी हल्ला, गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाल्यानं खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून भरवस्तीत पोलिस कर्मचाऱ्याच्या लहान भावाने कुऱ्हाडीने सपासप वारकरून तरुणाची हत्या केल्यानंतर आज त्या तरुणाच्या चाहत्यांकडून आरोपीच्या भावाला वार करत बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे औंध गावात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. अंत्यविधी झाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.

प्रशांत दीक्षित (वय 22) असे आज जखमी झालेल्याचे नाव आहे. तर क्षितिज कांताराम वैरागर (वय 21, रा. औन्ध गाव) याचा खून काल सायंकाळी झाला होता. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसांनी अनिकेत दिलीप दिक्षित (वय 23, रा. बॉडीगेट पोलीस लाईन, औंध) याला पकडले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैरागर व आरोपींमध्ये पूर्वीचे वाद होते. क्षितिज याने तीन महिन्यांपूर्वी अनिकेत याच्यावर वार केले होते. या रागातून अनिकेत याने काल क्षितिज याच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला होता. क्षितिज याच्यावर पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल आहे. तर चतुशृंगी पोलीस ठाण्यात यापूर्वीचा असे दोन गुन्हे दाखल आहेत. दरम्यान आज क्षितिजचा अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर क्षितिज याच्या चाहत्याकडून प्रवीण याच्यावर वार करण्यात आले आहेत. स्पायसर रोडवर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अनिकेत व प्रशांत यांचा भाऊ नितीन दीक्षित हे पुणे शहर पोलीस दलात बीडीडीएस नेमणुकीस आहेत. अधिक तपास सुरू आहे.

इंटेजिलेन्स कमी पडतंय
चतु:शृंगी पोलिसांचे इंटेजिलेन्स यामुळे कमी असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांचा वचक देखील यावरून दिसत आहे. कारण यात खून झालेला क्षितिज हा पिंपरी चिंचवड शहरातील कुविख्यात टोळीशी निगडित असल्याचे सांगण्यात येते. त्याच्यावर दोन गुन्हे जरी दाखल असले तरी तो खूपच खुंखार असल्याचे कळते. आणि त्याचा खून झाल्यानेच आजचा हा प्रकार घडला असल्याचे बोलले जाते. यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. तर हे एका टोळी युद्धाला आमंत्रण आहे, असे बोलले जात आहे.