Pune : भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अल्पवयीन मुलांनी घरात घुसत केले तलवारीने वार, रामटेकडीमधील घटना

पुणे : गेल्या वर्षी झालेल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी दोघा अल्पवयीन मुलांनी घरात शिरुन तलवारीने एकावर वार केले. घरातील टिव्ही, कपाटाची तोडफोड केली. पुणे शहरात सायंकाळी सहा वाजल्यानंतर लॉकडाऊन सुरु होतो. संचारबंदी असताना रामटेकडी येथील विश्वरत्न मित्र मंडळाजवळ सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला. वानवडी पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी राजू एकनाथ थोरात (वय ४४, रा. रामटेकडी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैतरसिंग टाक याचा गेल्या वर्षी ऑगस्ट २०२० मध्ये खुन करण्यात आला होता. या कारणावरुन त्यांचे दोन अल्पवयीन भाऊ हे हत्यारे हवेत फिरवत थोरात यांच्या घराजवळ आले. ‘‘मेरे भाई पैतर को तुम सब लोगो ने मिलकर मार डाला. अब मै किसीको जीना नही छोडुंगा’’ असे म्हणाला. त्यामुळे लोकांनी घाबरुन तेथून पळून जाऊ लागले. त्यानंतर ते दोघे थोरात यांच्या घरात शिरले. थोरात यांना ‘‘तेरा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडुंगा़ मेरे भाई के मर्डरमे उसका भी हात है,’’ असे म्हणून शिवीगाळ करु लागले. तेव्हा थोरात यांनी ‘‘माझ्या मुलाने काय केले आहे,’’ असे विचारल्यावर त्यांनी हातातील लोखंडी कोयता थोरात यांच्या डोक्यावर जोरात मारला असता, त्यांनी तो हुकवला. तो कोयता घरातील फ्रिजच्या दरवाजाला लागला. ते पाहून त्यांची पत्नी, मेव्हणी यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी घरातील टीव्ही, पाण्याचा माट, कपाटाची काच कोयत्याने फोडल्या. त्याचवेळी तेथे पोलीस आल्याचे पाहून कोयता तेथेच टाकून दोघे पळून गेले.

थोरात यांच्या शेजारी राहणार्‍या घरात शिरुन या दोघांनी त्यांच्याही घरातील साहित्यांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे, भूषण पोटवडे यांनी घटनास्थळी भेट दिली. वानवडी पोलिसांनी दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे अधिक तपास करीत आहेत.