Pune : मुंढव्यात लाईट गेल्यावर चोरीचा प्रयत्न, अल्पवयीन मुलाला पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लाईट गेल्यानंतर अंधाराचा फायदा घेत चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलाला पकडले; पण, तो सतत चोऱ्या करत असल्याने जमावाने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करून त्याला सोडल्यानंतर त्या मुलाने यानंतर संधी साधत पकडलेल्या तरुणावर हल्ला केला. मुंढव्यात हा प्रकार घडला आहे.

याप्रकरणी रोहन महेश पवार (वय 19) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा चोऱ्या करतो. दरम्यान केशवनगर भागात शनिवारी रात्री लाईट गेली होती. त्यामुळे भागात अंधार होता. ही संधी साधत अंधाराचा फायदा घेऊन त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण, काही लोकांनी त्याला पकडले. तो सतत लहानसहान चोर्‍या करीत असल्याने जमलेल्या लोकांनी व फिर्यादीने त्याला मारहाण केली. पण, तो लहान असल्याने त्याला नंतर सोडूनही दिले. त्यानंतर फिर्यादी हे शनिवारी घराबाहेर थांबले असताना तो परत आला आणि त्याने फिर्यादी यांच्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर कोयत्याने वार करून त्यांना जखमी केले. फिर्यादीची आई त्या दोघांचे भांडण सोडविण्यासाठी आल्या. तर त्याने त्यांच्यासोबत देखील झटापट केली. यात त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तुटुन खाली पडले व ते गहाळ झाले. अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.