Pune : बँक डेटा चोरी प्रकरणी 13 आरोपींना जामीन मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नामांकित बँकेमधील निष्क्रिय खात्यातील २१६ कोटी रुपयांच्या डेटा चोरी प्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेल्या १३ आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी जामीन मंजूर केला.

रवींद्र माशाळकर, मुकेश मोरे, राजशेखर यदेहा ममिडी, रोहन मंकणी, विशाल बेंद्रे, आत्माराम हरिश्चंद्र कदम, वरूण श्रीकदम वर्मा, विकासचंद यादव, राजेश शर्मा, परमजीतसिंग संधू, अनघा मोडक, लक्ष्मीनारायण गुट्टू व व्यंकटेश उपाला अशी जामीन मंजूर झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी जामीनसाठी न्यायालयात वेगवेगळे अर्ज केले होते.

सदरील आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ४१९, ४२०तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ४३/६६ आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींच्या वकिलांनी आजमितीला एकही बँक फसवणुकीसंदर्भात आपणहून पुढे आली नसून त्यामुळे आरोपींनी फसवणूक केल्याचे निष्पन्न होत नसून आरोपींना जामीन मंजूर करण्यात यावा , असा युक्तीवाद केला. यावर सरकारी वकिलांनी यातील काही आरोपी हे पुण्यातील रहिवासी नसून सदर आरोपींना जमीन मंजूर झाला तर ते यासारखाच दुसरा गुन्हा करतील तसेच पोलीस तपासात अडथळे आणतील असे सांगितले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींचा जामीन मंजूर केला. आरोपी आत्माराम कदम यांच्या तर्फे ऍड. प्रमोद धुळे, ऍड.मजहर मुजावर यांनी बाजू मांडली तसेच रवींद्र माशाळकर तर्फे ऍड. अनेय कुलकर्णी व विकासचंद यादव तर्फे ऍड. सुहास कोल्हे यांनी बाजू मांडली.