Pune : ‘तू माझा बाप आहेस का? तू मला सांगणारा कोण?’ हवालदारास मारहाण करणार्‍या शिपायाचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : मोबाईलवर कॉल करून नाकाबंदीसाठी हजर राहण्यासाठी सांगितल्यावरून पोलिस शिपायाने पोलिस हवालदारास गज तसेच लाथांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी शिपायाचा अटकपूर्व जामीन अर्ज जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने फेटाळला आहे.

सुरज जालिंदर पवार (नेमणुक, भोसरी वाहतुक विभाग पिंपरी चिंचवड ) असे अटकपूर्व जामीन फेटाळलेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस हवालदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दापोडीतील हॅरीस पूलावर 22 एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजता घडली होती.

कोविड 19 प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली आहे. पोलिस मुख्यालयात नेमुणकीस असलेले पोलीस हवालदार यांना भोसरी पोलिस ठाणे अंतर्गत बंदोबस्तासाठी दापोडीतील हॅरीस पूल येथे नाकाबंदी पॉईंटवर नेमण्यात आले होते. याच ठिकाणी सुरज पवार यालाही नाकाबंदीसाठी नेमले होते. पवार हा 22 एप्रिल रोजी रात्री साडेदहापर्यंत बंदोबस्तासाठी न आल्याने फिर्यादींनी त्याला कॉल केला तसेच बंदोबस्तासाठी येण्याबाबत सांगितले. त्यावरून दोघांत शाब्दिक वाद झाले.” तू माझा बाप आहेस का? तू मला सांगणारा कोण” असे पवार फिर्यादी यांना म्हणाला. त्यानंतर पवारने पूलावर येत फिर्यादीच्या डाव्या पायावर गजाने मारहाण केली. फिर्यादी हे जमिनीवर कोसळल्यानंतर पवारने फिर्यादीच्या तोंडावर बुटाने लाथा मारल्या. त्यामध्ये फिर्यादींच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.

आरोपीला ज्ञान असूनही त्याने गुन्हा केला : सरकार पक्ष

पवार याला कायद्याचे ज्ञान असूनही त्याने गंभीर गुन्हा केला आहे. आरोपी आणि फिर्यादी यांच्यातील फोनवरील संभाषण अर्जदार आरोपीच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाल्याची शक्यता आहे. संबंधित फोन आरोपीकडून जप्त करायचा आहे. त्यामुळे त्याला अटक करून पुढील तपास करण्यासाठी त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी सरकारी वकील प्रदीप गहलोत यांनी केली.