पुणे बार असोसिएशनचा मनसेचे कोथरूड मधील उमेदवार अ‍ॅड. किशोर शिंदेंना पाठिंबा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे बार असोसिएशनने कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अ‍ॅड. किशोर शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला. तसेच पुणे बार असोसिएशनच्या मागिल अनेक वर्षापासून असलेली उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी अ‍ॅड. शिंदे सोडवतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. पुणे बार असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकित किशोर शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

पुण्यामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. पुण्यातील अनेक वकिलांना आणि पक्षकारांना मुंबई येथे जावे लागते. त्यासाठी उच्च न्यायालयाच्या खंडपीठीची मागणी बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. अनेक वेळा पाठपुरावा करून देखील मागणी पूर्ण झालेली नाही. तसेच पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट यांनी लेखी आश्वासन दिले होते. तरी देखील मागणी पूर्ण झाली नाही.

बार असोसिएशनने शासनाकडे पुण्यात उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची स्थापना करून त्यासाठी जमीन देण्याची मागणी केली आहे. तसेच पुण्यात उच्च न्यायालयाचे फिरते खंडपीठाची स्थापना करण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक नियोजन करुन निधी उपलब्ध करून देण्याची प्रमुख मागणी बार असोसिएशनने केली आहे. पुण्यात लवकरात लवकर उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी यावेळी बार असोसिएशनने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्याकडे केली आहे.

visit : policenama.com