यवतमधील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेचा छापा, 12 जणांवर FIR – 93 लाखांचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यातील यवत तालुक्यातील कानगावात भीमा नदीमधील अवैध वाळू उपश्यावर बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला आहे. पोलिसांनी येथून तब्बल 93 लाख रुपयांचा ऐवज जप्त करत 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. राज्यभरात तहसिल अधिकार्‍यांवर वाळू माफियांकडून जीव घेणे हल्ले होत असताना बारामती पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले जात आहे.

याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात दत्तात्रेय गोविंद नानखिले, मनोज गोविंद नानखिले, राहुल येडे (राहणार सुरे), बाप्पू माळवदकर, मोहन मरळ, बाळासाहेब भोसले, भाऊ फडके, नाना गवळी अंकुश गवळी (सर्व. रा. गार ता. दौंड), विशाल बाबासाहेब मुंडेकर (रा. मुंढेकरवाडी, ता. श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर), दिनेश बाळासो फडके (रा. कानगाव, ता. दौंड) आरद मंजू आलम (रा. कटघरा, राज्य झारखंड, सध्या रा. कानगाव) व त्यांचे इतर साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

sand

राज्यात अवैधरित्या नदीपात्रातील वाळूचा उपसा करून त्याची विक्री केली जात आहे. त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. शासनाची फसवणूक करून वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू उपसा रोखण्यासाठी तहसिल कार्यालयांना आदेश देण्यात आले आहेत. मात्र, राज्यभरात अनेक ठिकाणी तहसिलदार तसेच त्यांचे पथक येथे गेल्यानंतर वाळू माफियांकडून त्यांच्यावर जीव घेणे हल्ले केले जात आहेत.

दरम्यान, यवत तालुक्यातील कानगाव येथील भीमा नदीच्या पात्रातून वाळूची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यानुसार या माहितीची खातरजमा करण्याचे आदेश त्यांनी बारामती गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या पथकाला दिले.

sand

माहितीनुसार यवत पोलीस तसेच महसूल विभागातील अधिकार्‍यांना घेऊन बारामती गुन्हे शाखेने याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी वाळू उत्खनन करण्याचा कोणताही लिलाव करण्यात आला नसताना बेकायदेशीरपणे यांत्रिक बोटीने वाळू उपसा करून ट्रॅक्टर्स आणि ट्रकमध्ये भरून चोरी करताना समोर आले आहे.

पोलीसांनी येथून चार फायबर लोखंडी बोटी, चार लहान बोटी, दोन ट्रक, दोन जेसीबी, तीन ट्रॅक्टर आणि 10 ब्रास वाळू असा एकूण 93 लाख 30 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तर, 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांना पुढील कारवाईसाठी यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले, तसेच सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे व महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी केली आहे.