पुण्यातील उद्योजक अनिर्बन सरकार यांना ‘चॅम्पियन ऑफ चेंज अ‍ॅवॉर्ड 2020’ जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   इन्टरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी या संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा ‘चॅम्पियन ऑफ चेंज अ‍ॅवॉर्ड 2020’ डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रा. लि. चे कार्यकारी संचालक अनिर्बन सरकार यांना जाहीर झाला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल  भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते गोवा येथील ताज हॉटेलमध्ये 16 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात सरकार यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

उद्योजक अनिर्बन सरकार हे डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रा. लि. चे कार्यकारी संचालक असून या कंपनीने जलशुद्धीकरण, सौर ऊर्जा आणि सिव्हेज वॉटर ट्रीटमेंट क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. वॉटर ट्रीटमेंट विषयातील जाणकार म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. विविध सेमिनारमध्ये ते जलशुद्धीकरण या विषयावर लेक्चर देतात. त्याशिवाय भारतातील सामाजिक स्थिती, शैक्षणिक धोरण, राजकीय परिस्थिती या विषयांवरील सेमिनारमध्ये सहभाग घेऊन आपले विचार मांडले आहेत. अलीकडेच त्यांना नेपाळमधील गांधी पीस फाउंडेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे ‘गांधी तत्त्वज्ञान, राजकीय परिस्थिती, शांतता आणि मानवता’ या विषयासाठी डॉक्टरेट बहाल केली आहे. डेक्कन एव्ही मीडिया सर्व्हिसेसचे संचालक म्हणूनही ते काम पाहतात.

इन्टरॅक्टिव्ह फोरम ऑन इंडियन इकॉनॉमी ही सरकारमान्य सामाजिक संस्था असून या संस्थेतर्फे स्वच्छ भारत अभियान, कोव्हिड योद्धा, आरोग्य सेवा, राष्ट्रीय कर्तव्य अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, व्यक्तींना सन्मानित केले जाते. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या वर्षी भारताचे उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू तर दुसऱ्या वर्षी भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.