पुण्यातील कथित माहिती अधिकार कार्यकर्त्याचा  ‘स्पेशल-२६’ 

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाइन
काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या अक्षयकुमारच्या ‘स्पेशल-२६’ या चित्रपटाला साजेशी घटना उघडकीस आली आहे. एका कथित माहिती अधिकारी कार्यकर्त्यानेच हा बनाव रचून पोलिसांना सोबत घेत एका व्यावसायिकाला साडेपाच लाखाचा गंडा घातला आहे. अखेर जामिनावर सुटलेल्या व्यावसायिकानेच हा प्रकार पोलिस अधीक्षक गेडाम यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर तपासात खरी घटना उघड झाली.याप्रकरणी पुण्यातील कथित माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रमेशन याच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात पोलिसांनी कुठलीही चौकशी न करता रमेशन व साथीदार यांना अधिकारी समजून त्यांच्या सोबत धाड टाकायला गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकसह आठजणांची कार्यात हलगर्जीपणा केल्याने सर्वांची कसून चौकशी करण्यात येणार आहे.  पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.असे घडले बनाव नाट्य
दि. २२ एप्रिल रोजी  पुणे येथील माहिती अधिकारी कार्यकर्ते  श्रीजीत रमेशन व त्यांचे सहकारी आनंद सदावर्ते, अनिल बनसोडे, राजबहाद्दर यादव, गाडी चालक इरफान, रमेशन यांचा सशस्त्र अंगरक्षक पुणे पोलिस मोरे यांनी डाव रचून सिंधुदुर्ग पोलिस, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेशी संपर्क केला.’आम्ही  दिल्ली येथून आलो आहोत, आमची ओळख कुणालाही देता येत नाही.’ निरुखे येथील एका व्यक्‍तीने घरामध्ये मोठ्या प्रमाणावर रोख रक्‍कम तसेच डिझेल, पेट्रोलचा अवैध साठाकरून ठेवलेला आहे त्या ठिकाणी आपल्याला छापा टाकायचा आहे असे सांगितले.

ठरल्याप्रमाणे रमेशन आणि साथीदार यांनी पोलिसांना घेऊन निरूखे येथील रामदास करंदीकर यांचे घर गाठले. रात्रीच्या ९ वाजता करंदीकर यांना खोटी माहिती सांगून घराची झडती सुरु केली. पोलीस सोबत असल्याने गोंधळलेल्या करंदीकर यांच्या काहीही लक्षात आले नाही. यावेळी करंदीकर यांनी काजू आणि जांभूळ विक्रीतून मिळवलेली रोख साडे आठ लाखाची रक्कम मिळून आली. करंदीकर यांच्या विनवणीनंतर ४४ हजार रुपये त्यांना खर्चासाठी त्यांच्या कपाटात परत ठेऊन दिले. बाकी रकमेतून पोलिसांकडे १,८५,७१० रुपये रक्कम पंचनाम्यात दाखवण्यासाठी दिली. यानंतर बाकी रक्‍कम एका व्यक्‍तीने करंदीकर यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याने बाहेर घेऊन जात , आणलेल्या गाडीमध्ये ठेऊन दिली. पोलिसांना झालेल्या कारवाईबद्दल रिपोर्ट तयार करून गुन्हा नोंदवायला सांगून रमेशन यांनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी करंदीकर यांच्या घराच्या बाहेर आढळून आलेल्या पेट्रोल व डिझेलचे कॅन, कॅन ठेवलेली महिंद्रा पिक-अप गाडी व १ लाख ८५ हजार ७१० रुपये रोख रक्‍कम यांचा पंचनामा करून ताब्यात घेतली. तसेच रामदास करंदीकर यांना ताब्यात घेऊन कुडाळ पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.

दरम्यान ,रामदास करंदीकर २३ एप्रिल रोजी जामिनावर सुटले. व्यवसायासंदर्भात सर्व कागदपत्रे घेऊन ताळेबंद केले असता सुमारे साडेपाच लाख रुपये संशयितांनी नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच साडेपाच लाख रुपयाच्या रक्‍कमेबाबत पंचनाम्यात उल्लेख केलेला नाही.  यांनतर करंदीकर यांनी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेऊन झालेला प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. पोलीस अधीक्षक गेडाम यांनी ताबडतोब या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोपी रामेशनसह आठ जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले असून त्यांना लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती दिली.