Corona Virus : पुण्यात कोरोना व्हायरसवर प्रतिबंधात्मक ‘लस’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगभरात दहशत पसरवली आहे. आतापर्यंत हजारो लोक या कोरोना व्हायरसचे बळी पडले आहेत. या व्हायरसला रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहे. मात्र, सगळीकडून अपयश आलं असताना, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला यात यश मिळालं आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी या इन्स्टिटयूटन अमेरिकन बायोटेक्नॉलॉजी कंपनी कोडाजेनिक्सच्या मदतीनं लस विकसित केली आहे. ही लस प्राथमिक स्तरावर वैद्यकीय चाचणीसाठी उपलब्ध असून, सहा महिन्यांनतर एखाद्या व्यक्तीवर या लसीची चाचणी घेतली जाईल.

कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी एसआयआय आणि कोडाजेनिक्सद्वारे विकसित करण्यात आलेली लस एक सुरक्षाकवच असल्याचा दावा केला जात आहे. एसआयआयचे सीईओ आदर पूनावाला यांनी सांगितलं कि, ‘ही विकसित होणारी लस प्रचंड रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते. सहा महिन्यांत मानवी चाचणीसाठी ही लस तयार होईल. ही भारताची पहिली लस असेल, जी इतक्या वेगानं या स्तरापर्यंत आणण्यात यश प्राप्त झालं आहे.’

२०२२ पर्यंत होणार तयार :
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी मानवी चाचणी केल्यानंतर या लसीला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मंजुरी मिळवावी लागेल. त्यानंतर तिचा वापर करण्यात येईल. मात्र लसीच्या संशोधनासाठी एक वर्ष लागेल. या संपूर्ण प्रक्रियेनंतर २०२२ च्या सुरुवातीला या लसीची निर्मिती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ही लस विकसित झाल्यानं जागतिक स्तरावर पसरलेल्या साथीच्या रोगाचा सामना करण्यात भारत किती सक्षम आहे, हेच यातून दिसतं, ‘असं पूनावाला यांनी सांगितलं.

चीनमध्ये १८०० हून अधिक बळी :
जगभरात पसरलेल्या या आजाराचे हुबेई प्रांतात सर्वाधिक बळी आहेत. कोरोनामुळे १८६८ जणांचा बळी गेला असून ७२ हजार ४३६ जण यामुळे संक्रमित आहेत तर १०९७ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सोबतच ११ हजार ७४१ रुग्णांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने याबाबत माहिती जारी केली.