Pune : खून होण्यापुर्वी सराईत गुन्हेगार माधव वाघाटेनं साथीदारांच्या मदतीने बिबवेवाडीत केला होता खुनाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  बिबवेवाडीत खून झालेल्या गुन्हेगार माधव वाघाटेवर खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबवेवाडीत शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याने वाढदिवसाचे स्टेट्स ठेवल्याचा रागातून त्याचा खून होण्यापूर्वी त्याने व साथीदारांनी या तरुणाच्या खूनाचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणी सावन गवळी (वय 23, ओटा स्कीम) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यानुसार माधव वाघाटे व त्याच्या दहा ते बारा साथीदारावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावन गवळी याने मित्र आनंद कामठे याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेट्स व्हाट्सअ‍ॅपला ठेवले होते. याचा राग माधव वाघाटे व त्याच्या गॅंगला आला. त्याने दहा ते बारा मूलसोबत घेत मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी येथील ब्रह्मा भेळ येथील गल्लीत मंदिराजवळ फिर्यादी सावन गवळी याला “बघ आज तुझे तुकडे करायला माझी गॅंग आली आहे”, असे म्हणत कोयत्याने त्याच्या डोक्यात वार केला. पण, फिर्यादी याने तो वार चुकवला. त्यानंतर इतर आरोपींनी बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर माधव वाघाटे याचा खून झाला, असे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अतुल थोरात हे करत आहेत.

दरम्यान यातील फिर्यादी सावन गवळी याला माधव याचे खून प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे, असे थोरात यांनी सांगितले.