Pune : बेकायदेशीररित्या पिस्तुल घेऊन फिरणार्‍या तरूणाला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीररित्या पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. एका सराईत गुन्हेगारांने त्याला हे पिस्तुल विक्रीसाठी दिले होते.

कुणाल नारायण जाधव (वय 22, रा. काळेपडळ, हडपसर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात घरफोड्या, वाहन चोरी आणि लुटमरीच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेला गस्त घालून सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांचे तपास पथक माहिती काढत होते. यावेळी पोलीस नाईक शंकर कुंभार यांना बतमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज कोंढवा रोडवर एकजण थांबला असून, त्याच्याजवळ पिस्तुल आहे.

यानुसार वरिष्ठ निरीक्षक वसंत कुवंर, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, कर्मचारी प्रणव संकपाळ, हर्षल शिंदे, शिवदत्त गायकवाड व त्यांच्या पथकाने त्याला सापळा रचून पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तुल मिळाले. चौकशी केली असता त्याला हे पिस्तुल हडपसर येथे राहणाऱ्या सराईत गुन्हेगार शुभम पांचाळ याने विक्री करण्यासाठी दिले आहे. आता पोलीस शुभम पांचाळ याचा शोध घेत आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करत आहेत.