Pune : महामार्गावरील वाहने लडवून लूटमार करणार्‍याच्या तयारीतील टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   महामार्गावर वाहने अडवून लूटमार करणाच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. टोळीकडून घातक शस्त्र जप्त केले आहेत.

सुरेश बळीराम दयाळू (वय 29, रा. बिबवेवाडी), चांद फकरोद्दीन याकूब शेख (वय 22), कृष्णा विक्रम ढावरे (वय 22), असिफ अल्लाबक्ष शेख (वय 21), आशिष नवनाथ डाकले (वय 25, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरात घरफोडीसोबतच लूटमाराच्या घटना वाढल्या आहेत. काही केल्या स्ट्रीट क्राईम कमी होत नसल्याचे दिसत आहे. यापार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांना गस्त घालण्याच्या व माहिती काढून सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावेळी भारती विद्यापीठ पोलीस माहिती काढत असताना कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चार ते पाचजण जुन्या कात्रज बोगद्याजवळ थांबले असून, ते रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहन चालकाना लुटण्याच्या तयारीत आहेत. यानुसार पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेंद्र पाटील, हवालदार श्रीधर पाटील, गणेश सुतार, राजू वेगरे, निलेश खोमणे, प्रणव संकपाळ, समीर बागसीराज, हर्षल शिंदे, शिवदत्त गायकवाड, प्रदीप शिंदे यांच्या पथकाने त्यांना सापळा रचून पकडले. यावेळी त्यांच्याकडे घातक शस्त्र व इतर साहित्य असा 6य हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सुरेश दयाळू हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर शेख हा देखील सराईत गुन्हेगार आहे. त्याला शहरातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांनी एका व्यक्तीला लुटले असल्याची कबुली दिली आहे.