Pune : नवीन कात्रज बोगद्याजवळ ट्रक चालकांना अडवून लुटमार करणार्‍या सराईतांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक, हत्यारे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कात्रज नवीन बोगद्याजवळ ट्रकचालकांना अडवून लुटमार करण्याच्या तयारीत असलेल्या सराईत टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून कोयते, मोबाईल असा ३७ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.

आकाश भरत थोरात (वय २४), सचिन आप्पा रणदिवे (वय ३०) ओंकार भाउसाहेब रणदिवे (वय २२, तिघेही रा. आंबेगाव खुर्द) तुषार आनंदा दुधाणे ( वय २०, रा. कात्रज) , तनिष्क संतोष सोनवणे (वय १८ रा. कात्रज ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक व गुन्हे शाखेच्या पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कात्रज नवीन बोगद्याच्या अलीकडे पाचजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना मिळाली. संबंधित टोळीकडे शस्त्रास्त्रे असून ते ट्रकचालकांना लुटण्याच्या तयारीत असल्याचेही समजले. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार याठिकाणी छापा टाकत पाचजणांना पकडले. त्यांची झडती घेतली असता कोयते, मोबाइल मिळाले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत. सखोप तपास केला असता संपुर्ण टोळी सराइत असून त्यांच्याविरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

परिमंडळ दोनचे उपायुक्त सागर पाटील, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, गणेश सुतार, राजू वेगरे, शंकर कुंभार, निलेश खोमणे, प्रणव संकपाळ, समीर बागसिराज, हर्षल शिंदे, प्रदीप शिंदे, जगदीश खेडकर, शिवदत्त गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.