Pune : भेकराईनगर, तुकाई दर्शन, फुरसुंगीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती

पुणे : मागिल दोन वर्षांपूर्वी महापालिकेत समाविष्ट केलेल्या फुरसुंगी गावातील गंगानगर भेकराईनगर, तुकाईदर्शन परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. भल्या पहाटे सातववाडी आणि गोंधळनगर, हडपसर गावातील सार्वजनिक नळावर रांग लावून पाणी भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर किमान पाणी तरी मिळेल, अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती, तीसुद्धा फोल ठरली आहे. त्यातच कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे सूर्याजीराव पिसाळल्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे.

कोरोनामुळे मागिल वर्षभरापासून अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे बेजरोजगारीचे संकट ओढवले आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उपनगरालगतच्या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फुरसुंगी गावच्या हद्दीत कचरा डेपो असल्यामुळे पाण्याचे स्रोत खराब झाले आहेत. त्यामुळे महापालिकेकडून टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात आहे. भेकराईनगर चौकात सासवड रस्त्यावरच टँकर उभा असतो. वाहनांची प्रचंड वर्दळ असते, त्यामुळे या ठिकाणी नागरिकांना अपघाताचा धोका वाढला आहे. पालिकेकडून पुरविल्या जाणाऱ्या पाण्याच्या वेळा निश्चित नाहीत. रोजगार सांभाळायचा की पाणी भरण्यासाठी घरी थांबायचे असा सवाल नोकरदारवर्गाने उपस्थित केला आहे. कंपन्यांमध्ये नोकरी टिकविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. कोरोनाची भीती पाठ सोडत नाही. त्यातच उन्हाचा कडाका वाढला आहे. त्यातून भल्या सकाळी पाणी आणण्यासाठी सातववाडी, गोंधळेनगर, हडपसर गावातील सार्वजनिक नळावर जातो. तेथे नागरिकांची गर्दी होते, त्यामुळे पोलिसांकडून दमदाटी केली जाते. अशा एक ना अनेक समस्यांना तोंड देता देता आमच्या नाकीनऊ आले आहे. तुम्हीच सांगा आम्ही जगायंच तरी कस, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

तुकाईदर्शन येथील सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ होले म्हणाले, पालिकेकडून ५०-६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, तो अपुरा असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी सातववाडी, गोंधळेनगर, काळेपडळ, हडपसर येथील सार्वजनिक नळकोंडाळ्यावर जातात. मात्र, सार्वजनिक नळजोड कमी आहेत. फुरसुंगी गावातील नागरिकांना महापालिकेकडून बंद नलिकेतून पाणीपुरवठा केला जाणार होता. त्याचे काम अद्याप रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. सोसायटीतील नागरिक पाण्याचे टँकर विकत घेतात, असे त्यांनी सांगितले.