Pune : बिबवेवाडीत टोळक्याने दहशत माजवत वाहनांची तोडफोड केली

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – बिबवेवाडीत टोळक्याने दहशत माजवत रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. बुधवारी रात्री हा प्रकार घडला असून, टोळके हातात शस्त्र घेऊन फिरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी विनायक साळवे (वय ३५, रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चौघांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अप्पर इंदिरानगर येथील महाडिक चाळ येथे फिर्यादी यांनी त्यांच्या गल्लीत घराजवळ त्यांची मोपोड उभी केली होती. रात्री साडेआठच्या सुमारास चार जण आले. त्यांनी हातात धारदार शस्त्र घेऊन दहशत निर्माण केली. तसेच दुचाकीच्या मीटर बॉक्स व सीटकव्हरवर मारून नुकसान केले. तसेच, फिर्यादी यांचे भाऊ समीर साळवे यांच्या दुचाकीची हेडलाईट फोडली. तर, चित्रा पानसरे यांच्या कारच्या काचा फोडून नुकसान केले.

तसेच, परिसरात लावलेल्या तीन ते चार दुचाकींच्या सीटवर व टाकीवर हत्याराने वार करून दुचाकींचे नुकसान केले. त्यानंतर हातामध्ये शस्त्र घेऊन ती हवेत फिरवत मोठ्याने आरडा-ओरडा करून परिसरात दहशत निर्माण केली. त्यामुळे घाबरून नागरिकांनी दारे-खिडक्या बंद केल्या. या घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास पोलीस हवालदार संजय पुणेकर करत आहेत.