पुणे : बचत गटाच्या कामासाठी कर्ज देण्याच्या बहाण्याने महिलांना लाखोंचा गंडा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – बचत गटाच्या कामासाठी कर्ज मिळवून देण्याचे अमिष दाखवून मध्यवस्तीमधील महिलांची तब्बल पावणे चार लाख रुपयांना फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 2016 ते 2017 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी हवेली तालुक्यातील कोंढवे येथील महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन महिलांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बचत गटात काम करतात. आरोपी फिर्यादींच्या घरी आले. तसेच, बचत गट कामाकरीता कर्ज मिळवून देण्यासाठी शासनाच्या तरतुदीनुसार 1 हजार 200 रुपयांचे प्रमाणपत्र बनावावे लागेल, असे सांगितले. तुमच्या भागातील 60 ते 70 महिलांचे प्रमाणपत्र आम्ही विकत घेतले असल्याचे सांगत त्याबाबतचेे प्रमाणपत्र दाखविले. फिर्यादींचा विश्वास बसल्याने त्यांनी आरोपींकडे पैसे दिले. मात्र, तीन ते चार महिन्यानंतरही त्यांना कर्ज मिळाले नाही. यामुळे जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपींच्या घरी गेल्या. त्यावेळी त्यांना हडपसरमधील देवजी बापजी फायनान्स येथे जाण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी तेथे गेल्या. त्यावेळी तेथे त्यांना कार्ड शिवाय कर्ज मिळत नाही, असे सांगितले. त्यानंतर आरोपींनी त्यांना कर्जाची प्रोसेस करण्यासाठी म्हणून 2 हजार रुपये घेतले. तसेच, 1 लाखाचे कर्ज तीन महिन्यात देऊ असे आश्वासन दिले व शासन मान्यतेची कागदपत्रे दाखविली.

फिर्यादींसोबतच आणखी काही महिल्यांचा अशाच प्रकारे विश्वास संपादन करून त्यांच्याकडूनही पैसे घेतले. मात्र, कोणालाही कर्ज मिळवून न देता त्यांची 3 लाख 80 हजार रुपयांना फसवणूक करण्यात आली. याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात आरोपींविरोधात खटला दाखल केला होता. न्यायालयाने आरोपींवर गुन्हा दाखलकरून त्याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास सहायक निरीक्षक शिकलगार हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/