पुण्यात आजोबांना सांभाळण्यावरुन भावांमध्ये ‘तुंबळ’ हाणामारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील अपार्टमेंटमध्ये घरे छोटी असल्याने चौकोनी कुटुंबामध्ये आईवडिलांची अडचण होऊ लागली आहे. त्यात आजोबांची भर असेल तर विचारुच नका. आजोबांना कोणाकडे संभाळ करण्यासाठी ठेवायचे यावरुन चुलत भावांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाली. याप्रकरणी आंळदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अक्षय संभाजी भोरे (वय २५, रा़ म्हाडा कॉलनी, बदलापूर पूर्व, ता़ अंबरनाथ, जि़ ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी मनोज गंगाधर भोरे आणि सिद्धांत गंगाधर भोरे (रा़ कलाशंकर, घोरपडी, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आळदी येथील घासवाले धर्मशाळेत सोमवारी दुपारी साडेतीन वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, भोरे यांच्या घरात एकाचे निधन झाले होते. त्यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम आळंदी येथील घासवाले धर्मशाळेत ठेवला होता. त्यासाठी त्यांचे पुणे, मुंबई येथील नातेवाईकही आले होते. अक्षय भोरे हे बदलापूरात सोन्याचे व्यापारी आहेत. या कार्यक्रमानंतर फिर्यादी व आरोपी यांचे आजोबा रामकृष्ण भोरे यांना कोणाकडे संभाळ करण्यासाठी ठेवायचे यावरुन त्यांच्यात वाद झाला.

तेव्हा आरोपी मनोज भोरे याने अक्षय यांच्या डोक्यात दगड मारुन व सिद्धांत भोरे याने अक्षय व अक्षयचे वडिली संभाजी व भाऊ दिगंबर भोरे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी केली आहे.
या हाणामारीनंतर ते सर्व जण पोलीस ठाण्यात गेले़ त्यांनी तक्रार दिली़ मात्र, त्यानंतर आजोबांचा संभाळ नेमका कोण करणार याविषयी काय ठरले, हे समजू शकले नाही.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/