सणासुदींवर बंधने आल्याने पुण्याच्या बाजारपेठेला बसणार 250 कोटीहून जास्तीचा फटका

पुणे : भारतीय पंचांगानुसार ज्येष्ठ महिना ते कार्तिक महिना या काळात सण, उत्सव याची रेलचेल असते. या सणासुदीच्या काळात पुण्यामध्ये आषाढी पायी वारीचा मुक्काम, दहीहंडी, दहा दिवसांचा गणेशोत्सव, देवीचे नवरात्र वगैरे उत्सव सार्वजनिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात साजरे होतात. गणपती उत्सव तर सार्वजनिकरित्या आणि स्वतंत्रपणे घरोघरही होतो. मात्र, यंदा कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहाता पुण्यात उत्सव साधेपणानेच साजरे होतील. त्यावर खूप मर्यादा येणार आहेत. याचा परिणाम पुण्यातील बाजारपेठेवर अडीचशे कोटीहून अधिक होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आषाढी पायी वारीचा मुक्काम पुण्यात दोन रात्र असतो. सुमारे दोन लाख वारकरी या काळात पुण्यात मुक्कामाला असतात. यंदा पायी वारी निघणार नसल्याने पालखी पुण्यात येणार नाही. एरवी, वारीतील वारकऱ्यांचे पुण्यात भरभरून स्वागत होते. वारीत गुडदाणी, केळी, बिस्किटे, औषधे यांचे वाटप, तसेच मुक्काम काळात वारकऱ्यांना गोडधोडाचे जेवण, पालखी प्रस्थानाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी, दाण्याचे लाडू या पदार्थांचे वाटप वारकऱ्यांना करण्यात येते. दी पूना मर्चंट्स चेंबर्सचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी दिलेल्या माहितीनुसार वारीच्या काळात धान्य बाजारपेठेत पंचवीस कोटींची उलाढाल होते. याखेरीज सलून, चप्पल दुरुस्ती करणारे, छत्र्या-रेनकोट दुरुस्ती करणारे, मालीश करणारे, हार- फुले-पाने विक्रेते, फुगे-खेळणी विक्रेते, मक्याची कणसं-खारे दाणे विक्रेते, केळी विक्रेते, गंध लावणारे असे छोटेमोठे व्यावसायिक या काळात चांगली कमाई करतात. पालखी मार्गावर पुणे हे एकमेव मोठे शहर लागते त्यामुळे वारकरी बी-बियाणे, खतं, पिकांवर फवारणीसाठी औषधं अशाप्रकारची अन्य खरेदीही येथे करतात. यंदा ही पंचवीस ते तीस कोटीची उलाढाल ठप्प होणार आहे.

वारी पाठोपाठ गणेशोत्सवात शंभर ते सव्वाशे कोटीची उलाढाल अगदी सहजपणे होते. यंदा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरल्याने ही सव्वाशे कोटीची उलाढाल होणार नाही. त्याचा विपरीत परिणाम साऊंड सिस्टीम, मंडप, शिल्पकार, सजावटकार, धान्य विक्रेते, मिठाई विक्रेते, इलेक्ट्रिकल सामान विक्रेते यांच्या व्यवसायावर होणार आहे. याखेरीज चहावाले, शेंगा विक्रेते, फुलं विक्रेते, फळं विक्रेते अशा किरकोळ विक्रेत्यांच्या धंद्यावरही होणार आहे.

आषाढी वारी, गणेशोत्सव या काळात एस.टी, पीएमपीचे उत्पन्न वाढलेले असते. यंदा त्या उत्पन्नालाही मुकावे लागणार आहे.

यंदा दहीहंडी होण्याची शक्यता फारच कमी आहे. कोरोनाचे सावट शारदीय नवरात्रावरही राहील. नवरात्रही साधेपणाने होईल. पर्यायाने सर्व बाजारपेठेची अडीचशे कोटीहून अधिक हानी होईल. नुकसानीचा हा आकडा कदाचित जास्तही असेल.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या जीवनात आर्थिक संकट आले आहे. सणासुदीच्या काळात छोट्यामोठ्या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कामगार आणि कलाकारांच्या हाती चार पैसे येतात. यंदा मात्र त्यांच्यासाठी हे सणवार ‘कोरडे’ जाणार आहेत.