Pune : घरगुती गणेश विसर्जनावरून भाजप-काँग्रेस आमने-सामने

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यंदाच्या गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पुणेकरांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा. तसेच पुणेकरांनी घरगुती गणेश विसर्जन घरातच करावे असे आवाहन पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. यावरून आता राजकारण तापल्याचे पहायला मिळत आहे. पुण्यातील घरगुती गणेश विसर्जनावरून पुणे मनपात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत.

काँग्रेसने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या आवाहनाला विरोध दर्शवला आहे. पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्यात तब्बल चार लाख घरगुती गणपती बसतात. एवढ्या गणेश भक्तांनी घरातच नेमकं कसं विसर्जन करायचं असा सवाल काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी उपस्थित केला आहे. गणेशोत्सव हा शेवटी धार्मिक विषय असल्याने तो तितक्याच संवेदनशीलपणे हाताळला जावा, अशी अपेक्षा आबा बागुल यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी प्रमाणे यांदाही महापालिकेने सोशल डिस्टंन्सिंग पाळून पुणेकरांना नदीत, कॅनॉलमध्ये किंवा हौदात गणेश विसर्जन करु द्यावं, अशी भूमिका बागुल यांनी मांडली आहे. आबा बागुल यांचा हा प्रस्ताव महापौरांनी फेटाळून लावलाय. पुण्यात दरवर्षी विसर्जन मिरवणुकीला किमान पाच लाख मूर्ती विसर्जन होतात. यावर्षी मात्र कोरोनामुळे गणपतीच्या खुल्या विसर्जनाला परवानगी शक्य नाही,

कारण असे केले तर सर्जनासाठी एका मूर्तीसाठी चार लोक जरी धरले तरी तब्बल 20 लाख लोक घराबाहेर पडतील. सोशल डिस्टन्सिंग पाळणं केवळ अशक्य बनून जाईल, असे महापौरांनी सांगितले. त्यामुळे भाजप-काँग्रेस पक्ष आता एकमेकांविरोधात आले आहेत. या प्रश्नावर पालिका सभागृहात हे पक्ष नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहण महत्त्वाच आहे.