Pune News : भाजप नगरसेवक महेश लडकत प्रदीर्घ आजाराने निधन

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  – नगरसेवक महेश लडकत (वय 53) यांचे सोमवारी संध्याकाळी उशिरा प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे. लडकत यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी (दि.29) वैकुंठ स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत.
पतित पावन संघटनेत कामाला सुरुवात नंतर नवी पेठेतील भाजपचे कार्यकर्ते म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात करणारे महेश लडकत यांनी शहर भाजप मध्ये विविध पदावर काम केले.

महापालिका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 2017 मध्ये नवी पेठ – पर्वती प्रभागातून ते नगरसेवकपदी निवडून आले. या कालावधीत त्यांनी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत येवलेवाडी गावच्या विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली.

सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळून आणि सर्वपक्षाच्या कार्यकर्त्यांशी सहजगत्या रममाण होणारे व्यक्तिमत्व म्हणून ते परिचित होते. ते उद्यम विकास सहकारी बँकेचे अध्यक्ष होते.