पुणे भाजपकडून ‘या’ नेत्यांच्या सभांची मागणी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यात लोकसभेसाठी भाजपने गिरीश बापट यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे शहर शाखेने लोकसभा निवडणूकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्याचे नियोजनही करण्यात आले आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ६ सभांची मागणी करण्यात आली आहे. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याही सभांची मागणी केली आहे. त्याशिवाय शहरातील चौक सभा, रोड शो, कोपरा सभा यांचेही नियोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी दिली.

पक्षाच्या केंद्रीय व राज्य शाखेने पुण्यात प्रचाराचे योग्य नियोजन करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार बैठका घेऊन आणि विविध समित्यांची स्थापना करून काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात सभा व्हाव्यात अशी मागणी केली आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याही सभा मागण्यात आल्या आहेत. सभांसाठी जागा शिल्लक नाहीत. या नेत्यांच्या सभांसाठी मोठी मैदानंदेखील हवी आहेत. त्यासाठी संस्थांशी बोलणी सुरु आहे. भाजपकडून आपल्या शैलीमध्ये चौक सभा, कोपरा सभा यावर भर दिला असून सर्व केंद्र प्रमुख, बुथ केंद्र प्रमुख तसेच नगरसेवकांच्या मदतीने त्याचे नियोजन केले आहे.