Pune : भाजप नेते लागले महापालिका निवडणुकीच्या तयारीला

पुणे – महापालिका निवडणुका दीड-पावणेदोन वर्षांनी होणार आहेत. मात्र, राजकीय पक्षांना यंदाच्या दिवाळीपासूनचे एक वर्ष तयारीला मिळणार आहे. त्यादृष्टीने भाजपची यंत्रणा कार्यरत झाली असून शहरातील विकासकामांचा नियमित आढावा घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट आणि पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे तिघे तसेच महापालिकेचे पदाधिकारी, आमदार, नगरसेवक यांच्या दर पंधरा दिवसांनी नियमित बैठका घेण्यात येणार आहेत. अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांनी सांगितली.

येरवडा, वडगांव शेरी आदी परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असणारा भामा आसखेड प्रकल्प, शहरासाठीची समान पाणीपुरवठा योजना, मेट्रो रेल, मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्प असे मोठे प्रकल्प मार्गी लावून पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. समान पाणीपुरवठा योजनेसाठी खासदार गिरीश बापट यांच्या उपस्थितीत महापालिकेत विस्तृत बैठकही घेण्यात आली. पीएमपीचा प्रवास प्रवाशांसाठी अधिक सुलभ व्हावा आणि प्रवाशांना काही सवलती देण्यात येतील का? याचा विचार पक्ष पातळीवर करण्यात येत आहे. विमानतळापासून नुकतीच पीएमपीची खास स्मार्ट बस योजना सुरु करण्यात आली आहे.

महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी मिळकत कराच्या थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली. त्यातून योजनेच्या पहिल्या पंधरा दिवसातच पन्नास कोटीहून अधिक उत्पन्न मिळाले. या योजनेतील रक्कम आणखी वाढेल अशी अपेक्षा भाजपच्या नेत्यांना आहे.

मेट्रो रेलचा स्वारगेट-कात्रज असा विस्तार तातडीने करता यावा याकरिता राज्य शासनाची मान्यता मिळाविण्यासाठी मुख्य सभा मंजूरी देईल या भरवशावर सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. विस्तार प्रकल्पाला विलंब होऊ नये असा त्यामागे हेतू असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. सर्व पक्षाच्या नेत्यांना विश्वासात घेऊन मेट्रो रेल विस्तारीकरणाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला असे रासने यांनी स्पष्ट केले.

मार्च महिन्यापासून कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी रुग्णांवर उपचार करणे, त्यासाठीचा खर्च करणे याला प्राधान्य दिले. शहराची ती गरज होती. साथ आता नियंत्रणात येते आहे. साथ नियंत्रणात आणण्याचे काम चालू असताना अन्य विकासकामांकडे दुर्लक्ष केलेले नाही असेही रासने यांनी ठामपणे सांगितले.