Pune : रविवारी भाजपचे पदवीधर मतदार नोंदणी अभियान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघात लक्ष केंद्रित केले आहे. या मतदारसंघात प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील यांनी भाजपच्या वतीने प्रतिनिधित्व केले होते. या मतदारसंघात निवडून येण्यासाठी मतदार नोंदणी हा महत्त्वाचा घटक असतो. भाजपकडे कार्यकर्त्यांचे मोठे नेटवर्क असल्याने मतदार नोंदणी पद्धतशीरपणे होते आणि भाजपचा सहज विजय होतो. यंदा मात्र राजकीय स्थिती बदलली असल्याने भाजप सावध पावले टाकत आहे. भाजपचा उमेदवार अद्याप ठरलेला नाही. मध्यंतरी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नांव चर्चेत होते पण नंतर चर्चा थांबली.

भाजपच्या वतीने येत्या रविवारी शहरात पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान राबविण्यात येणार आहे असे संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी ऑनलाइन पद्धतीने सुमारे चाळीस हजार मतदारांची नोंदणी केली आहे. रविवारी महाअभियानाद्वारे एकाच दिवशी पंचवीस हजार मतदारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे पांडे यांनी सांगितले. नोंदणी अभियानाच्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सर्व केंद्रांना भेटी देणार आहेत. २०१४ च्या पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्या निवडणूक आयोगाने रद्द केल्यामुळे पदवीधर मतदारांना नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे.

You might also like