Pune : भाजपाची डोकेदुखी वाढली ! यापुढे नेतेच रस्त्यावर आंदोलन करणार ? संतप्त भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरअध्यक्षांची निवड झाल्यानंतर शहर कार्यकारिणी जाहीर होण्यास मोठा विलंब लागला आहे. परंतू या विलंबानंतर दुसर्‍या टप्प्यात काही पदाधिकार्‍यांची कालच नियुक्ती करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना डावलून अन्य पक्षांतून आलेले व नेत्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना स्थान देण्यात आल्याने भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये रोष वाढला आहे. अगदी २५ वर्षाच्या सेवेचे हेच फळ का ? यापुढे रस्त्यावर आंदोलन नेतेच करणार ? असे जाहीर प्रश्‍न विचारत कार्यकर्ते रोषाला वाट करून देउ लागल्याने भाजप नेत्यांपुढील डोकेदुखी वाढली आहे.

भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मतदार संघातून निवडणुक लढविल्यानंतर अगोदरच दोन गटांमध्ये असलेल्या शहर भाजपमध्ये तिसर्‍या गटाचा उदय झाला आहे. अशातच मागील महापालिका निवडणुकीत भाजपला एकहाती सत्तेपर्यंत मजल मारण्यासाठी विरोधी पक्षांना खिंडार पाडणारे संजय काकडे यांची खासदारकी संपुष्टात आल्यानंतर त्यांचे पक्षातील वर्चस्व अल्पकालीन ठरले आहे. महापालिकेत सत्तेत कायमच भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांना स्थान मिळाल्याने काकडे समर्थक नगरसेवक बाजूलाच पडले आहेत. दीड वर्षांवर आलेल्या महापालिका निवडणुका लक्षात घेउन शहर कार्यकारिणीच्या विस्तारत बाहेरून आलेल्या काही नगरसेवक व बिनीच्या शिलेदारांना स्थान देउन चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. परंतू यामुळे मूळ भाजपच्या कार्यकर्ता दुखावला गेला आहे.

सहा वर्षांपुर्वी शहरात जेमतेम असताना सत्ताधार्‍यांना कायमच अंगावर घेण्याची जबाबदारी अनेकवर्षे ज्या कार्यकर्त्यांनी पार पाडली, तेच कार्यकर्ते आता पक्षाला नकोसे झाले आहे. राज्यात सत्ता असताना केवळ बड्या नेत्यांच्या अवतीभवती असणार्‍या विविध महामंडळ आणि पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. महापालिकेतही अशीच काही मोजक्या लोकांना संधी देण्यात आली. यानंतरही कुठलीही मागणी न करता अनेकजणांनी पक्ष कार्यात झोकून देत कार्य केले आहे. ऐन कोरोना काळातही राज्यातील महाआघाडी सरकार विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलने केली आहेत. किमान पक्षाच्या कार्यकारिणीवर स्थान मिळेल, अशी त्यांची माफक अपेक्षा होती. परंतू त्यातही निराशा झाल्याने अनेक कार्यकर्ते सर्वकाही असताना काहीच मिळत नसेल, तर यापुढे आणखी किती अपेक्षा ठेवायच्या. २५ वर्षे निष्ठेने काम करून पक्ष केवळ निवडणुकीसाठीच काम करत असेल तर थांबलेले बरे असे जाहीरपणे बोलू लागले आहेत. तर काहींनी कधी आंदोलनाकडे न फिरकणार्‍या कथित नेत्यांनी यापुढे आंदोलने करावीत, या शब्दात नाराजी व्यक्त करत असल्याने शहर भाजप पुढील डोकेदुखी वाढली आहे.