ठिकाणा रेस्टो अ‍ॅन्ड बारचा बाऊन्सर अटकेत

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन – पार्टीसाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणांशी गाणे लावण्यावरून वाद झाल्यानंतर त्यांना मारहाणकरून पसार झालेल्या ठिकाणी ला गुन्हे शाखेने अटक केली आहे. वाद झाल्यानंतर या दोघांना बोलवून घेण्यात आले होते, असे तपासात समोर आले आहे.

कुणाल मृगनाथ ठोंबरे (वय 21, कोथरूड) व योगेश विष्णू चव्हाण (वय 30, रा. वडगांव धायरी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गोखलेनगर परिसरातील एका विद्यार्थ्याने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या महिन्यात (दि. 27) फिर्यादी तरूण आणि त्याचे काही मित्र बाणेर रस्त्यावरील ठिकाणा रेस्टो अ‍ॅण्ड बारमध्ये पार्टीसाठी गेले होते. यावेळी गाणी बंद केल्याने विद्यार्थ्यांनी त्यांना गाणी लावण्याची विनंती केली होती. त्यावरून हॉटेलच्या व्यवस्थापन व महाविद्यालयीन तरुणांमध्ये वादावादी झाली होती. त्यावेळी बाऊन्सरनी त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, या बाऊन्सरचा शोध घेण्यात येत होता. त्यावेळी गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाला कुणाल व योगेश यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक अंजुम बागवान व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक विजय झंझाड, विशाल शिर्के यांनी त्यांना अटक केली.

दोन्ही बाऊन्सर हे एम. सेक्युरिटी नोकरीस होते. घटनेच्यावेळी ते वेगळ्या ठिकाणी काम करत होते. परंतु, वाद झाल्यानंतर त्यांना येथे बोलवून घेण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.